Thursday, March 26, 2015

बिडी काडी

माझे मूळ गाव थेऊर(चिंतामणीचे). तसे उरुळी कांचन (जिथे गांधीजींचा निसर्गोपचार आश्रम आहे) पण बालपण थेऊर मधेच गेले. आई-वडील तिथल्याच हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. आम्ही d-type चाळीमध्ये मध्ये रहायचो. साखर कारखान्याने ही चाळ बांधली होती. भरपूर मित्र. गोट्या, सूरपारंब्या, कांदाफोड, क्रिकेट, विष अमृत, लपाछपी, अप्पाराप्पी, शिवाजी म्हणतो, donkey-monkey, विटी दांडू, असे अनेक खेळ आम्ही खेळायचो. फुलपाखरे पकडायला जाणे, रात्रीच्या शेकोटीसाठी चोयट्या गोळा करून आणणे,मासे पकडायला जाणे, पोहायला जाणे, संध्याकाळच्या वेळेस काजवे पकडायला जाणे, आणि लिंबू टिंबू असल्यामुळे नेहमीच राज्य घालणे, २-२ किलोमीटर लंगडी घालणे, अशा अनेक “नोकऱ्या” केल्या. आता एवढया सगळ्या नोकऱ्या करून माणूस थकणार, हो कि नाही? मग थोडा विरंगुळा आणि काहीतरी वेगळे करण्याची भलती हौस. वय वर्ष : ८-९

आमच्या चाळीमध्ये पवार काका म्हणून रहायचे. (नाव बदललेले आहे :p). बाकी सर्व कुटुंबांच्यापेक्षा त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, अर्थात आमच्यासाठी त्या काळी,श्रीमंत या शब्दाची व्याख्या म्हणजे पवार कुटुंब! त्यांचा मुलगा म्हणजे आमचा खास मित्र; त्यांच्या घरी येणे जाणे असायचे. बऱ्याच वेळा आम्ही त्यांना काचेच्या ग्लासात औषध पिताना सुद्धा पहायचो. बऱ्याच वेळेस ते औषध पीत पीत, सिगारेट सुद्धा ओढायचे. आता मुख्य विषय इथे सुरु होतो!
तर सिगारेट ओढल्यावर काय होते बरे? नक्की हा प्रकार काय असतो? अच्छा तर मग ठरलं, सिगारेट ओढायची!!!! मी आणि माझ्या मित्राने खिसे चाचपले तर निघाले "चार आणे". दूध गोळ्या खाण्यासाठी मिळालेले, ५ पैशाला १ दूध गोळी मिळायची!!!! असो, तर सिगारेट!!!! एवढे माहित होते कि सिगारेट पिऊ नये, आरोग्याला चांगले नसते वगैरे, पण उत्सुकता स्वस्थ बसून देत नव्हती. कुलकर्णी पानवाल्याकडे कसे जायचे, कोणी काय विचारायचे सर्व plan तय्यार. खरतर सर्व काही मीच करणार होतो. कुलकर्णी पानवाला बाबांचा विद्यार्थी, आता कसं करायचं? तरी धाडस बघा, मी गेलोच.

मी : १ सिगारेट द्या
पानवाला : कोणासाठी?
मी : पवार काकांसाठी. ते तिथे झाडाखाली थांबलेत.
पानवाला : २५ पैशात सिगारेट येत नाही,
मी : ठीक आहे बिडी द्या मग,

आणि त्याने दिली!!!!!! का दिली बरे? त्याला पवार काकांचा सिगरेटचा ब्र्यांड माहित होता, आणि त्यांच्या नावावर आम्ही २५ पैशात बिडी घेतली आणि त्याने ती दिली सुद्धा!!!

काडेपेटीचा बंदोबस्त करणे फार अवघड नव्हते. आता जागा! कुठे प्यायची बिडी? तर छतावर. आमचे छत म्हणजे सिमेंटचा पत्रा. तर दुपारच्या वेळेस आम्ही डाव केला. सगळीकडे सामसूम असताना बिडी आणि काडी घेऊन पत्र्यावरचा कोपरा गाठला. बिडी पेटवण्याचे अनेक प्रयत्न सुरु झाले. आमच्याच्याने ती पेटेना.
पेटली तर २ वेळा विझून गेली. यशस्वीरीत्या बिडी पेटवल्या नंतर पुढची पायरी होती झुरका मारणे. पहिल्याच झुरक्यात असा ठसका लागला म्हणून सांगू……तर त्या दिवसापासून आज पर्यंत ही गोष्ट गुपित म्हणून माझ्या आठवणींच्या पोतडीमध्ये बंद झाली.

No comments:

Post a Comment